औरंगाबाद: हिंदू मतात फूट होऊ नये तसेच लोकसेवक निवडण्यासाठी राष्ट्रहिताचा विचार करून उमेदवारी अर्ज न भरणार्या शांतीगिरी महाराजांनी काल ‘यू टर्न’ घेतला. शांतीगिरी महाराजांच्या अनुपस्थितीत भक्त परिवाराने घेतलेल्या बैठकीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय पंडित चक्रावले. महाराजांच्या या निर्णयाने मतदारसंघातील लढत अधिकच रंजक झाली यात शंका नाही.
शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सारी शक्ती पणाला लावलेल्या काँग्रेसवर याचा काय परिणाम होईल हे गणित अधिकच क्लिष्ट बनले. खैरे एक विरोधक अनेकअशी ही लढत. पूर्वी झालेल्या एकास एक एक फाईटमध्ये खैरे यांनी बाजी मारली. तिरंगी लढतीत ही खैरे यांचा विजय झाला. ही स्थिती बघता यावेळी विरोधी तीन आणि खैरे एक असे चित्र आहे. त्यामुळे खैरेंना निवडणूक सोपी जाईल, असे ठामपणे सांगणारे जास्त भेटतात. स्वतः महाराज उभे असतानाही खैरे जिंकतात तेव्हा पाठिंब्यावर पराभूत होतील हे म्हणणे चुकीचे, असेही मत व्यक्त होते. दुसरीकडे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर एवढा जबरदस्त आहे की, खैरे पराभूत होणारच !असाही दावा केला जातो. खैरे पराभूत होतील हे ठामपणे सांगणारे जिंकणार कोण याचे उत्तर देत नाहीत. काँग्रेसचे मतदार एमआयएम पळवेल त्यामुळे झांबड यांचा भरवसा नाही. सेनेचे मतदार हर्षवर्धन जाधव पळविणार त्यामुळे सेनेला फटका बसणार, असा गुणाकार भागाकार भल्याभल्यांची चंपी करून सोडतोय. हर्षवर्धन जाधव यांची भिस्त मराठा मतदारांवर आहे. स्वतःचे मतदार आणि भक्त परिवाराची साथ यामुळे यावेळी ’एक मराठा, लाख मराठा’ जिंकेल असे मेसेज फिरू लागले आहेत. ग्रामीण भागातून जाधवांना मोठी साथ मिळेल, असा दावा केला जातो. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात जिल्ह्यातून झाली याचाही दाखला दिला जात आहे. भाजप-सेनेपासून दूर गेलेला मराठा समाज यावेळी जाधव यांच्या पारड्यात भरभरून मत टाकेल, असा दावाही केला जातो. या सगळ्या गोळा बेरजेचा परिणाम येत्या काळात दिसू लागेल.
मीच सगळ्यात मोठा बाबा...
दरम्यान, यापूर्वी शांतीगिरी महाराजांना पराभूत करून माझ्या अध्यात्मिक शक्तीचा परिचय दिलाच आहे, यावेळीही माझेच अध्यात्म प्रबळ ठरेल, असा दावा खासदार चंद्रकांत खैरे करतात. स्वतः महाराज असले तरी फरक पडणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. आता महाराजांनी कट्टर विरोधी जाधव यांच्या पारड्यात वजन टाकल्याने खैरेंच्या अध्यात्मिक शक्तीचा कस लागणार, यात शंका नाही.